Join us

हॉक्सकॉलचे प्रकार ठाण्यात वाढले

By admin | Updated: November 29, 2015 01:23 IST

या वर्षात श्रीनगर पोलीस ठाण्यात हॉक्सकॉल प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये विमान उडवून देण्याबरोबर बॉम्ब आहे किंवा ते हायजॅक करण्यात येणार आहे, अशा कॉल्सचा समावेश आहे.

-  पंकज रोडेकर,  ठाणेया वर्षात श्रीनगर पोलीस ठाण्यात हॉक्सकॉल प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये विमान उडवून देण्याबरोबर बॉम्ब आहे किंवा ते हायजॅक करण्यात येणार आहे, अशा कॉल्सचा समावेश आहे. मात्र, विमान हायजॅक करण्यात येणार असल्याचा हा पहिलाच कॉल आहे. हे चारही कॉल परराज्यातून आले असले, तरी पोलिसांनी वेळीच खबरदारी घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, अशा प्रकारे येणाऱ्या कॉल्समुळे ठाणे शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्या कॉल्समुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांना ठाणे पोलीस सामोरे जात आहेत. वागळे इस्टेट येथे सदरलॅण्ड ग्लोबल सर्व्हिसेस आहे. तेथे विविध कंपन्यांचे कॉल सेंटर आहे. तेथील एअर इंडिया विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर विमान हायजॅक करण्यात येणार असल्याचा कॉल आला होता. तत्पूर्वी तेथील विविध कॉल सेंटरमध्ये तीन कॉल्स आले आहेत. जानेवारी महिन्यात एकापाठोपाठ दोन कॉल्स आले होते. एक कॉल हा आसाममधील एका १६ वर्षीय मुलाने केला होता, तर दुसरा कॉल हा रांची येथून आला होता. त्या प्रकरणी दोघांना अटक केली होती. याचदरम्यान, मे महिन्यात एअर इंडियाच्या कॉलसेंटरमध्ये विमान उडवून देण्याची धमकी आली होती. तो कॉल श्रीनगरमधून आला होता. हे तिन्ही कॉल बोगस असल्याचे तपासणीअंती उघडकीस आले, तर विमान हायजॅक करण्याचा हा शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पहिलाच कॉल आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेश मीणा या तरुणाला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. मात्र, तो कॉल बोगस आहे का? किंवा त्याचे अतिरेकी संघटनेशी संबंध असून, त्यातून त्याचा विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न होता का?, याचा तपास विविध खात्यांमार्फत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशा प्रकारे येणारे कॉल बहुतांशी गंमत म्हणून केल्याचे समोर आले आहे. मात्र, या कॉल्सना पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे आणि यापुढेही घेतले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त व्ही. बी. चंदनशिवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.