मुंबई : मोबाइल क्रमांक ब्लॉक केल्याच्या रागात एका इसमाने मैत्रिणीच्या दोन वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार मालवणीमध्ये घडला. या अपहरणकर्त्याचा गाशा गुंडाळून अपहृत मुलाची सुखरूप सुटका करण्यात सोमवारी मालवणी पोलिसांना यश आले.अर्णव रवी पाटील असे अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तो त्याच्या पालकांसोबत मालाड पूर्व परिसरात राहत होता. मात्र, त्याच्या आई-वडिलांना कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहावे लागत असल्याने, अर्णवला त्याची आई त्याला मालवणीच्या आझमीनगर परिसरात राहत असलेल्या त्याच्या मावशीकडे सोडून जात होती. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास श्याम मंडल (२५) नावाचा इसम अर्णवला फिरायला नेतो असे सांगून घेऊन गेला आणि परतलाच नाही. त्यानुसार, त्याच्या पालकांनी आणि मावशीने त्याचा सर्वत्र शोध घेतला आणि मंडलविरुद्ध मालवणी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला.मंडल हा अर्णवला घेऊन सुरतला पसार झाला होता. त्यानुसार, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप साळुंखे आणि स्टाफने अत्यंत शिताफीने तपास करत, सुरतहून अर्णवची मंडलच्या तावडीतून सुटका केली आणि मंडलला अटक केली. अर्णवची आई पाच वर्षांपूर्वी गोरेगावच्या एका जैन रुग्णालयात काम करत असताना तिची मैत्री मंडलसोबत झाली. मात्र, नंतर तिने त्याच्याशी मैत्री तोडली, तसेच त्याचा मोबाइल क्रमांकही ब्लॉक केला. त्याचा मंडलला राग आला आणि त्याने हा प्रकार केल्याचे खेतले यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
मैत्रिणीच्या दोन वर्षीय मुलाचे अपहरण
By admin | Updated: May 10, 2016 02:16 IST