Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेसावेतील दोन अनधिकृत इमारती पडल्या; आणखी इमारतींवर केली जाणार कारवाई

By जयंत होवाळ | Updated: July 10, 2024 19:05 IST

जून महिन्यापासून आतापर्यंत सात अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या असून बुधवारी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या.

मुंबई : वेसावे भागातील स्थानिक पोलीस यंत्रणा आणि पालिकेच्या विभाग कार्यालयाने मधल्या काळात डोळ्यावर पट्टी बांधली होती की काय अशी परिस्थिती या भागात आहे. अलीकडच्या काळात या भागात बिनदिक्कीतपणे अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. जून महिन्यापासून आतापर्यंत सात अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या असून बुधवारी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या. येत्या काही दिवसात आणखी सात ते आठ इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. या एकूणच प्रकारावरून या भागात अनधिकृत बांधकामांचे पीक किती उदंड आले आहे याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

या बांधकामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते, तर दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. या भागातील अनधिकृत बांधकामांविषयी चर्चा करण्यासाठी खुद्द पालिका आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला निलंबित अधिकारी उपस्थित राहिला नव्हता. एकूणच वेसावेत अनधिकृत बांधकामाचे प्रमाण लक्षात घेता आयुक्तांच्या सूचनेवरून पालिकेच्या यंत्रणेने गेल्या काही दिवसापासून कारवाई सुरु केली आहे.

या भागातील आणखी दोन इमारती आज पाडण्यात आल्या. वेसावे भागात पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) ही अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. ३ जून पासून वेसावे गाव (शिवगल्ली) भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असून आतापर्यंत या भागातील सात इमारती पाडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तळमजला आणि तीन मजली, चार मजली तसेच पाच मजली अशा स्वरुपाच्या इमारतींचा समावेश आहे. आज पालिकेचे ३९ अधिकारी, ३० कामगार अशा मनुष्यबळासह एक पोकलेन संयंत्र, दोन जेसीबी, पाच हँडब्रेकर आदी संसाधनांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. या भागातील अजून ७ ते ८ इमारतींवर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :मुंबई