ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भाग हगणदारीमुक्त व्हावा, म्हणून शौचालय बांधण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून अनुदान मिळायचे. मात्र, ही योजना आता ‘स्वच्छ भारत मिशन’(ग्रामीण) या नावाने ओळखली जाणार असल्याने त्या अनुदानातही दोन हजारांनी वाढ झाली आहे. शौचालयासाठी आता १० ऐवजी १२ हजार रुपये मिळणार आहेत. नुकत्याच जाहीर केलेल्या परिपत्रकामुळे ठाणे जिल्ह्यातील उर्वरित राहिलेल्या ४ हजार ४५९ कामांना त्याप्रमाणेच वाढीव अनुदान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत शौचालय बांधणीच्या ५ हजार कामांना मंजुरी दिली होती. त्यातील २२७ कामेही पूर्ण झाली असून उर्वरित ४ हजार ४५९ कामे ग्रामीण भागात सुरू आहेत. मात्र, नरेगा योजनेंतर्गत या कामांसाठी मिळणारे अनुदान देण्याचे बंद केले असून यापुढे शौचालयाच्या कामांना संपूर्ण रक्कम ही स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मंजूर निधीतून दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
ग्रामीण शौचालयांसाठी दोन हजार वाढीव
By admin | Updated: November 30, 2014 22:57 IST