Join us  

कोण आला रे, कोण आला...? खराखुरा वाघ आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 9:21 AM

वीराच्या निमित्ताने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात तब्बल १५ वर्षांनंतर वाघाचा जन्म झाला आहे. 

मुंबई : कोण आला रे कोण आला...या घोषणेला शिवसेनेच्या सभांमध्ये आसमंत दुमदुमून टाकणारा प्रतिसाद मिळतो. वर्षानुवर्षे हेच ऐकणाऱ्या मुंबईकरांनी मंगळवारी ऐकली ती मात्र खरीखुरी वाघाची डरकाळी. नोव्हेंबर महिन्यात जन्माला आलेल्या बछड्याचे मंगळवारी मुंबईकरांनी ‘वीरा’ असे नामकरण केले. वीराच्या निमित्ताने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात तब्बल १५ वर्षांनंतर वाघाचा जन्म झाला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर १ नोव्हेंबरपासून राणीबागेचे द्वार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यावेळेस करिश्मा गर्भवती असल्याने तिची विशेष काळजी घेण्यात येत होती. अखेर ९० दिवसांनंतर या वाघिणीने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका बछड्याला जन्म दिला. सध्या करिश्मा व तिच्या बछड्याला पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून दोन वर्षांपूर्वी राणीबागेत दाखल झालेल्या करिश्मा आणि शक्ती या वाघाच्या जोडीला गेल्या वर्षी बालदिनी बछडा झाला. सन २००६ मध्ये राणी बागेतील एकमेव वाघाचा तर २०१४ मध्ये सिंहाचा मृत्यू झाला. त्यानंतर पर्यटकांना या रुबाबदार आणि आक्रमक प्राण्याचे दर्शन दुर्लभ झाले होते. २००७ पासून महापालिकेने राणीबागेचे नूतनीकरण करण्यास सुरुवात केली. १२ फेब्रुवारी २०२० मध्ये औरंगाबादहून बंगाली वाघाची ही जोडी आणण्यात आली. त्यांच्यासाठी राणीबागेत नैसर्गिक वातावरण तयार करण्यात आले.अशी घेतली जातेय काळजी… मादी असलेल्या या बछड्याचे नामकरण वीरा असे करण्यात आले आहे. सध्या ती दोन महिन्यांची असल्याने तिची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. करिश्माची प्रकृती उत्तम असून तीदेखील आपल्या बछड्याचा चांगला सांभाळ करीत आहे. वीरा या वातावरणात मिसळेपर्यंत तसेच ती सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच ठेवण्यात येणार आहे. तिला जंताची औषधे व तीन आवश्यक लस देण्यात येत आहेत. अद्याप वीरा तिच्या आईजवळच राहत असल्याने पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या उपस्थितीत प्राणिपालास त्यांच्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.उद्यानात ऑगस्ट २०२१मध्ये जन्मलेल्या पेंग्विनचे बारसे चार महिन्यांनी मंगळवारी पार पडले. मोल्ट आणि फ्लिपर या जोडीचे बाळ... त्याचे नाव आता ‘ऑस्कर’ ठेवले आहे.महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणीबागेतील थ्री डी ऑडिटोरियममध्ये केक कापून या दोन नवीन पाहुण्यांचे बारसे साजरे केले. दक्षिण आफ्रिकेतून आणलेले हॅम्बोल्ट जातीचे पेंग्विन राणीबागेत आहेत. मागील वर्षभरात डोनाल्ड आणि डेझी तसेच मॉल्ट आणि फ्लिपर या नर-मादी पेंग्विनच्या जोडीने पिल्लाला जन्म दिला आहे. यापैकी ओरिओचा जन्म सोहळा ऑगस्ट महिन्यात साजरा करण्यात आला होता. मी ओरिओ...ऑस्कर आता ५ महिन्यांचा झाला असून, आकाराने तो ओरिओपेक्षाही मोठा दिसतो. ओरिओ ९ महिन्यांचा झाला आहे. अनेकदा एकटाच फिरताना दिसतो. दोघांची चांगली गट्टीही जमल्याचे कर्मचारी सांगतात.