Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रींना मदत करणारे एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि कॉमेडियन भारती सिंह यांच्या जामिनासाठी ...

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि कॉमेडियन भारती सिंह यांच्या जामिनासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

एनसीबीने अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनच्या शोधादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा चेहरा उघड केला. यात, अनेकांची धरपकड सुरू झाली. कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनाही अटक झाली. २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी जामिनाला विरोध करत कोठडीची मागणी करणे गरजेचे असताना तपास अधिकारी पंकज कुमार गैरहजर राहिले. त्यामुळे दोघांना जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र पंकज कुमार यांनी सरकारी वकिलाने सुनावणी २४ तारखेला असल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. सरकारी वकिलांनी हे आरोप फेटाळून लावत, ठाणे न्यायालयात दुसरे प्रकरण असल्याने सुनावणीला येणार नसल्याचे सांगितले होते असे नमूद केले आहे.

तर दुसऱ्या अधिकाऱ्याने अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना वकील मिळवून देऊन मदत केल्याचा आरोप केला आहे. शिवाय करिश्मा प्रकाश यांच्याविरोधात पैसे पुरवणे आणि आरोपीला आश्रय देणे याबाबतचे कलम लागू नये म्हणूनही मदत केल्याचा आरोप आहे.

यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप एनसीबीकडे असल्याचे समजते. त्यानुसार एनसीबीचे अधिकारी अधिक चौकशी करत आहेत.