Join us

बेस्टखाली चिरडून दोन तरुणी ठार

By admin | Updated: June 29, 2015 06:11 IST

भरधाव वेगात जाणाऱ्या बेस्टच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात घडली. याबाबत बीकेसी पोलिसांनी बेस्ट चालकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

मुंबई : भरधाव वेगात जाणाऱ्या बेस्टच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात घडली. याबाबत बीकेसी पोलिसांनी बेस्ट चालकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. टीना मोटाणी (२७) आणि संध्या कोठारी (२६) अशी मृत तरुणींची नावे असून, दोघी चेंबूरच्या रहिवासी होत्या. बीकेसी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या या तरुणी शनिवारी दुचाकीवरून कामावर गेल्या. शनिवारी अर्ध्या दिवसाचे काम संपवून दोघी पुन्हा घराकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा सायंकाळी ५च्या सुमारास दुचाकीवरून चेंबूरच्या दिशेने येत असताना वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील सीटी बँक सिग्नलजवळ भरधाव वेगात ३१० नंबरच्या डबल डेकर बसने त्यांना धडक दिली. बस सिग्नलवर वळण घेत असताना बेस्टच्या चाकाखाली येऊन दोघीही गंभीर जखमी झाल्या. परिसरातील काही रहिवाशांनी तत्काळ दोघींना सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला. घटनेनंतर बेस्ट चालक नवदेव आनंदने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सायंकाळी आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)