मुंबई : भांडुपमध्ये तीन तासांत दोन तरुणांची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.भांडुप पश्चिमेकडील जंगलमंगल रोड येथे रॉबर्ट प्रकाश मुरगेश (२४) कुटुंबीयांसोबत राहत होता. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कोकण नगर येथील ताडीमाडी केंद्रात तो ताडी पित असताना शेजारी बसलेल्या तरुणाला त्याचा धक्का लागला. या रागातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत मुरगेशचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुरगेशला तत्काळ अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मुरगेशच्या हत्येचा गुन्हा दाखल होतो न होतो तोच भांडुप पोलीस ठाण्यात मध्यरात्री दोनच्या सुमारास भट्टीपाडा येथे भाजी विक्रेत्याच्या हत्येची घटना समोर आली. महेंद्र चौहान असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. अनोळखी इसमाने त्याच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने हल्ला चढवून निर्घृण हत्या केली. चौहानला अग्रवाल रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अवघ्या तीन तासांत दोन तरुणांच्या हत्येच्या घटनांनी भांडुप परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
भांडुपमध्ये तीन तासांत दोघांची हत्या
By admin | Updated: November 14, 2015 02:44 IST