Join us  

‘जेट एअरवेज’च्या दोन अधिकाऱ्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 1:03 AM

व्यवसाय बंद पडलेल्या जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला.

मुंबई : व्यवसाय बंद पडलेल्या जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. त्याच्या आदल्या दिवशी कंपनीचे उपमुख्य कार्यकारी आणि मुख्य आर्थिक अधिकारी अमित अग्रवाल यांनी कंपनी सोडली.भारतीय-अमेरिकन विनय दुबे अमेरिका, युरोप आणि आशियातील डेल्टा एअरलाईन्स, सॅब्रे इंक आणि अमेरिकन एअरलाईन्समध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर काम करून आॅगस्ट २०१७ मध्ये जेट एअरवेजमध्ये दाखल झाले. ‘विनय दुबे यांनी वैयक्तिक कारणांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा ताबडतोब राजीनामा दिला आहे, असे जेट एअरवेजने मंगळवारी म्हटले. जेट एअरवेजचे तेव्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रॅमेर बॉल त्या पदावरून दूर झाल्यावर जवळपास १५ महिन्यांनी दुबे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले होते. या कालावधीत दुबे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत होते.जेट एअरवेजने सोमवारी अमित अग्रवाल यांनी वैयक्तिक कारणांनी मुख्य आर्थिक अधिकारीपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. जेट एअरवेज विकत घेण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील गट मोठे प्रयत्न करीत असताना कंपनीतून दोन ज्येष्ठ कार्यकारी अधिकारी सोडून गेले आहेत.रोख पैशांच्या टंचाईमुळे गेल्या महिन्यापासून जेट एअरवेजचे कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे. जेट एअरवेजवर आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. एसबीआय कॅप्स ही स्टेट बँक आॅफ इंडियाच्या व्यावसायिक शाखेने २६ धनकोंच्या वतीने ८ ते १२ एप्रिलदरम्यान इच्छुकांकडून निविदा मागवल्या व चार निविदा मिळाल्याही आहेत.

टॅग्स :जेट एअरवेज