मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करण्याकरिता काही आमदार कमी पडले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. शिवसेना आमचा शत्रू नव्हता आणि नाही, असे हे नेते सांगत असले तरी शिवसेनेने गेल्या काही दिवसांत केलेल्या टीकेमुळे नाराज होऊन कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेऊ नका, अशी मागणी कार्यकर्ते खासगीत करीत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सरकार स्थापनेत राष्ट्रवादी महत्वाची भूमिका बजावेल, असे टि¦ट केले. त्याकडे लक्ष वेधले असता तावडे म्हणाले की, पटेल यांना हरियाणाबाबत बोलायचे असेल. महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची साथ भाजपा घेणार नाही, असे तावडे यांनीही स्पष्ट ेकेले. त्याचवेळी शिवसेना हा काही भाजपाचा शत्रूपक्ष नाही, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तर, भाजपाला कुणाच्याही मदतीखेरीज सरकार बनवता येईल, असा दावा एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी केला.
तशीच वेळ आली तर सरकार बनवण्याकरिता शिवसेनेची मदत घेण्याची भाजपा नेत्यांची तयारी आहे. मात्र शिवसेनेची मदत घेण्याची कल्पना भाजपाच्या कार्यकत्र्याच्या पचनी पडलेली नाही. शिवसेनेने गेल्या काही दिवसांत व विशेष करून मतदानाच्या तोंडावर केलेल्या टीकेमुळे भाजपाचा कार्यकर्ता दुखावला आहे.
मोदींच्या वडीलांचा केलेला उल्लेख, मोदी ‘चहावाला असल्याबाबत केले गेलेले वक्तव्य आणि ‘अफझलखानाची फौज’ असा उल्लेख यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. खडसे यांच्या घरासमोर जाहीर सभा घेऊन त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याकरिता कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची मदत घेऊ नका, असा नाराज कार्यकत्र्याच्या मागणीचा रेटा नेत्यांवर आहे.