मुंबई : ऐसपैस आणि मोठ्या आकाराच्या घरामध्ये राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतू शहरामध्ये लहान आकाराची घरे असल्याने घरातील प्रत्येकाला तडजोड करावी लागते. यावर उपाय म्हणून आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी थ्रीडी आणि फोर डी घरे बनवली आहेत. दहा बाय दहाच्या खोलीचे दोन मजली घर तयार करुन विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांना नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रीअल डिझाईन सेंटरच्या (आयडीसी) वतीने ४ डी लिव्हिंग : फॉर्म हाऊसिंग टू अर्फोटेबल लिव्हिंग प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असून ते १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन टाटा हाऊसिंगचे प्रमुख अरूण काशीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात आयटीसी विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेली थ्रीडी आणि फोर डी पद्धतीची घरे मांडण्यात आली आहेत. थ्रीडी घराची रचनेमध्ये १0 बाय १0 ची खोली स्वयंपाकघर, टेबल, सोयीप्रमाणे हलवता येणाऱ्या भिंती, फोल्डिंगचे फर्निचर आणि बाथरुमची आवश्यता नसल्यास त्याचाही किचन आणि इतर जागेसाठी वापर करता येऊ शकतो. याच खोलीचे दोन मजली घरही विद्यार्थ्यांनी तयार करुन दाखवले आहे.फोर डी आकाराची घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारता येतील. सोयीप्रमाणे हलविता येणाऱ्या भिंतीने एका घराच्या दोन खोल्या तयार करता येतात. यातील एक खोली भाड्यानेही देता येईल, असाही उपाय या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुचविला आहे. (प्रतिनिधी)
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनविले एका घराचे दोन मजली घर
By admin | Updated: January 17, 2015 01:37 IST