Join us

फरार घरगड्यासह दोघे गजाआड

By admin | Updated: February 27, 2015 01:36 IST

मिनोती पारेख (५०) या महिलेची हत्या करून पसार झालेल्या दिलीप मंडल (१९) या घरगड्याला जुहू पोलिसांनी हरियाणातून अटक केली

मुंबई : मिनोती पारेख (५०) या महिलेची हत्या करून पसार झालेल्या दिलीप मंडल (१९) या घरगड्याला जुहू पोलिसांनी हरियाणातून अटक केली. चौकशीत या हत्याकांडात त्याच्या सख्ख्या भावाचा सहभाग आढळल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्याचे नाव श्याम मंडल असे आहे. श्याम याला दिल्लीतून गजाआड करण्यात आले. या दोघांकडून पारेख यांच्या घरून चोरलेला सुमारे ३३ लाखांचा ऐवजही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.दिलीप हा पारेख यांच्या घरी दोनेक महिन्यांपासून घरगड्याचे काम करत होता. जुहू-विलेपार्ले स्कीम परिसरातील गुरूकृपा सोसायटीत राहणारे पारेख दाम्पत्य एका लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. लग्नावरून परतल्यानंतर मिनोती यांनी परिधान केलेले कोट्यवधींचे दागिने काढून कपाटात ठेवताना दिलीपने पाहिले. त्याचक्षणी त्याने मिनोती यांची हत्या करण्याचा कट आखला. या कटात त्याने श्यामलाही सहभागी करून घेतले. २३ फेब्रुवारीला मिनोती घरी एकाकी असल्याची संधी साधून दोघांनी त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यांचा मृतदेह शौचालयात दडवून दोघांनी सुमारे ३३ लाखांचा ऐवज चोरला. दिलीपने सर्व ऐवज श्यामच्या हाती देत हरियाणा गाठले. तर त्याच्यापाठोपाठ श्याम दिल्लीत दाखल झाला. दिलीप फरार झाल्याने पोलिसांना सुरुवातीपासून त्याच्यावर संशय होता. तांत्रिक तपासावरून जुहू पोलिसांनी दिलीपचा शोध सुरू केला होता. श्याम हा वाळकेश्वर परिसरात राहणाऱ्या कुटुंबाकडे घरगडी म्हणून काम करत होता. मात्र मालकासोबत खटके उडू लागल्याने त्याला कामावरून कमी करण्यात आले होते.