Join us

दोन कोटींच्या सदनिका भलत्यालाच विकल्या

By admin | Updated: September 27, 2014 06:06 IST

एका ग्राहकाकडून आधी दोन कोटी ८२ लाख रुपये घेऊनही त्याला त्या मोबदल्यात आठ सदनिकांचा ताबा देण्याऐवजी त्या परस्पर भलत्याच ग्राहकाला विकल्या

ठाणे : एका ग्राहकाकडून आधी दोन कोटी ८२ लाख रुपये घेऊनही त्याला त्या मोबदल्यात आठ सदनिकांचा ताबा देण्याऐवजी त्या परस्पर भलत्याच ग्राहकाला विकल्या. त्यांनी या बिल्डरकडे विचारणा केल्यानंतर त्याने वरील रकमेचे धनादेश दिले. मात्र, तेही बाऊन्स झाले आणि ग्राहकाला ठार मारण्यासाठी रिव्हॉल्व्हरही रोखले. संबंधित ग्राहकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.विलेपार्ले येथील रहिवासी विधान आणि यश बगारिया या दोघांनी श्रीराम कन्स्ट्रक्शन लि.चे संचालक अनिलकुमार सिंग आणि त्यांचे भागीदार सुधा सिंग, विकास सिंग यांच्याकडून पाचपाखाडी येथील ‘सुरज रामा हाइट्स’ येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आठ सदनिकांची नोंदणी केली होती. त्यातील तिसऱ्या मजल्यावरील ३०१, ३०२, ३०३ आणि ३०४ तर पहिल्या मजल्यावरील १०१, १०२, १०३ आणि १०४ या सदनिका यश यांच्या नावाने विधान बगारिया यांनी खरेदी केल्या होत्या. मात्र, विधान यांची कोणतीही परवानगी न घेता अनिलकुमार यांनी त्या अन्य ग्राहकांना परस्पर विकल्या. ताबा घेण्यासाठी बगारिया कुटुंबीय गेले असता, त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आले. रकमेचाही अपहार करण्यात आला. दरम्यान, सिंग यांनी बगारिया यांना दिलेले धनादेशही बाऊन्स झाल्यामुळे त्यांना धक्काच बसला. याप्रकरणी बगारिया यांनी थेट न्यायालयात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. आता हा गुन्हा न्यायालयातून आलेला असल्यामुळे सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)