मुंबई : आॅस्टे्रलिया-श्रीलंका सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या दोन बुकींना काल समाजसेवा शाखेने दादासाहेब भडकमकर मार्ग परिसरातील सहार हॉटेलमधून अटक केली. मनीष शहा, अनिलकुमार रामखेनी अशी या बुकींची नावे आहेत. हे दोघे क्रिकेट वर्ल्डकपमधल्या आॅस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यावर बेटिंग घेत होते.दोन मोठ्या बुकींनी सहार हॉटेलमध्ये स्वतंत्र खोल्या घेऊन बेटिंगचा अड्डा सुरू केल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार एसीपी राजदूत रूपवते यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी एकाच वेळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये धाड घातली. तेव्हा एका खोलीत शहा आणि त्याचे साथीदार सापडले. तर दुसऱ्या खोलीत अनिल आणि त्याचे साथीदार. या कारवाईत समाजसेवा शाखेच्या दोन्ही पथकांनी एकूण २ लाख ३५ हजारांची रोकड, २० मोबाइल फोन, एक लॅपटॉप आणि क्रिकेट बेटिंगच्या नोंदी असलेले साहित्य हस्तगत केले. बुकी आणि त्यांच्या चार साथीदारांना भारतीय दंड संहितेतील फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि इंडियन टेलिग्राफ अॅक्टमधील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.तपासात बुकींकडे सापडलेल्या मोबाइलमधील सिमकार्ड बनावट नावे व कागदपत्रांआधारे खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हे प्रकरण पुढील तपासासाठी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. पोलीस या बुकींचे पंटर, अन्य साथीदार आणि परदेशी बुकींशी संपर्क याचा तपास करणार आहेत. (प्रतिनिधी)
दक्षिण मुंबईमधून दोन बुकींना अटक
By admin | Updated: March 10, 2015 00:45 IST