मुंबई : दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह तिच्याच घराजवळ सापडला. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये ही घटना घडली. लहान मुले बेपत्ता होणे, त्यांचे मृतदेह सापडणे अशा प्रकारची ही आठ दिवसांमधली दुसरी घटना आहे. ऋतुजा लक्ष्मण दुरकर असे या मृत मुलीचे नाव असून, ती शिवप्रेरणा चाळीत आईवडिलांसोबत राहत होती. १२ मार्च रोजी संध्याकाळी ती घराबाहेर खेळत होती. काळोख पडल्यावरही ती घरी न परतल्याने आईवडील तिला बोलावण्यासाठी घराबाहेर पडले; मात्र ती घराजवळ कुठेच सापडली नाही. संपूर्ण महाराष्ट्र नगर व आसपासच्या वस्त्या पिंजण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध न लागल्याने अखेर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला. शनिवारी सकाळी पालिकेच्या सफाई कामगारांना शिवप्रेरणा चाळीजवळच्या एका बंद गटाराच्या खाली ऋतुजाचा मृतदेह सपडला. त्यांनी तत्काळ रहिवाशांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी हा मृतदेह ऋतुजाचाच असल्याची खात्री करून राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक चौकशीत मुलगी गटारात पडून मृत झाली असावी, अशी शक्यता पोलीस व्यक्त करतात. मात्र घराजवळच हे गटार असल्याने दोन दिवसांत तिचा मृतदेह कोणालाच का दिसला नाही, या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत. यामुळे चिमुरडीची हत्या झाली का, असा संशयही निर्माण झाल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. ऋतुजाची हत्या झाल्याचा आरोप तिचे नातेवाईक करीत आहेत. तूर्तास पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मुलीच्या मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती ट्रॉम्बे पोलिसांनी दिली आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेल्या आठ दिवसांमधली ही दुसरी घटना आहे. ७ मार्चलादेखील अशाच प्रकारे घरात झोपलेल्या दीड वर्षीय अब्दुला शेख या मुलाचे त्याच्या वडिलांनी अपहरण करून त्याची हत्या केली होती. दोन दिवसांनंतर महाराष्ट्र नगर परिसरातच या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिसांनी त्याच्या वडिलांवर हत्येचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
अडीच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
By admin | Updated: March 15, 2015 02:22 IST