Join us

सव्वीस गाव नळपाणी योजना अखेर कार्यान्वित

By admin | Updated: May 19, 2015 23:05 IST

कुंडलिकेच्या तीरावर असलेल्या सव्वीस गावांना गेली अनेक वर्षे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत होता.

रोहा : कुंडलिकेच्या तीरावर असलेल्या सव्वीस गावांना गेली अनेक वर्षे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत होता. माजी आ. मीनाक्षी पाटील व विद्यमान आ. पंडित पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कुंडलिकेच्या दोन्ही तीरांवरील गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात आला आहे. परिणामी या २६ गावांना यापुढे मुबलक पाणी मिळणार आहे. गेली दहा वर्षे रखडलेली पाणी योजना कार्यान्वित झाल्याने रोहा तालुक्याने टँकरमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले असल्याचे दिसून येत आहे.शेणवई येथील सामाजिक कार्यकर्ते व्ही. टी. देशमुख यांनी एमआयडीसीमार्फत सव्वीस गावांना पाणीपुरवठा व्हावा, अशी कल्पना मांडली होती. २००४ साली या योजनेचा नारळ वाढविला होता. परंतु २००९ पर्यंत या योजनेचे काम मार्गी लागले नव्हते. २००९ साली तत्कालीन आ. मीनाक्षी पाटील आणि पंडित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून योजनेसाठी एमआयडीसीकडून निधी मिळविला. चार कोटी रुपये खर्च असणारी ही योजना पूर्ण होईपर्यंत एकोणीस कोटींवर गेली. सदर योजना कार्यान्वित करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अखेर दहा वर्षे रखडलेली पाणी योजना कार्यन्वित झाल्याने रोहा तालुक्याने टँकरमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.या योजनेचा फायदा करंजविरा, यशवंत खार, सानेगाव, वावेपोटगे, डोंगरी शेणवई, भातसई, पडम, खारापटी या गावांसह खारी ते महादेवखार आदी गावांना होणार आहे. या योजनेचे उद्घाटन करंजविरा येथे आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर वावडुंगी येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी गावातील १६ तरुणांनी योगदान केल्याबद्दल आमदार पाटील यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. या प्रसंगी गटविकास अधिकारी रमेश भामुद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता सुळे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेंगुर्लेकर उपस्थित होते. (वार्ताहर)वावडुंगीला मिळाले पाणी४आमदार पंडित शेठ पाटील म्हणाले की, वावडुंगी गावाला पाणीटंचाईची खूप मोठी समस्या होती. ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत पाणीपुरवठा व्हावा अशी कल्पना मांडली. त्यासाठी लागणारा निधी मिळवून देण्याचे काम केले. २३ लाख ८० हजार रुपये खर्च असणारी योजना पूर्ण करण्यात आली असून आज तमाम महिलांच्या डोक्यावर असलेला हंडा उतरला याचे खूप समाधान वाटते.