Join us

वीस स्थानकांचा होणार कायापालट

By admin | Updated: January 16, 2015 03:34 IST

येत्या काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील स्थानकांचा मोठा कायापालट झालेला दिसून येणार आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) स्थानकांचा

मुंबई : येत्या काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील स्थानकांचा मोठा कायापालट झालेला दिसून येणार आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) स्थानकांचा विकास करताना मोठ्या प्रमाणात कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सुरुवातीला २0 स्थानकांचा समावेश केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये एलिव्हेटेड स्थानके बांधून त्यावर सुविधा देण्यात येणार आहेत. एमआरव्हीसीने एमयूटीपी-३ मधील पनवेल-कर्जत दुहेरीकरण, ऐरोली-कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू तिसरा आणि चौथा मार्ग यासह मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दोन स्थानकांमधील रूळ ओलांडणे रोखण्यासाठी विविध योजना आणि तांत्रिक कामे अशा प्रकल्पांना रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एमयूटीपी-३ मध्ये स्थानकांचा विकास करण्याची नवीन योजनाही आखली असून, हा प्रकल्पही मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. यात स्थानकांचा मोठ्या प्रमाणात कायापालट केला जाणार असून, एलिव्हेटेड स्थानकेच बांधली जाणार आहेत. ही स्थानके बांधतानाच यावर तिकीट खिडक्या, एटीव्हीएम मशिन, बुक स्टॉल्स, खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सची संविधा देण्यात येईल. महत्त्वाची बाब म्हणजे सरकते जिने, लिफ्ट आणि अत्याधुनिक अशी सुरक्षा यंत्रणाही असेल, असे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. सुरुवातीला तब्बल अशा २0 स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतल्याचे एमआरव्हीसीचे अध्यक्ष प्रभात सहाय यांनी सांगितले.