भार्इंदर : गेल्या ६० वर्षांत आघाडी सरकारला जे करायला जमले नाही, ते अवघ्या ४ महिन्यांतच मोदी सरकारने करण्यास सुरुवात केल्याचे गौरवोद्गार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढले. एकविसावे शतक हिंदुस्थानचेच असणार असल्याचा दावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी सभेत केला.मीरा-भार्इंदर, ओवळा-माजिवडा येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा आले होते. आघाडी सरकारने गेल्या १० वर्षांत देशाचे नुकसान केले. त्याचा हिशेब आघाडीने न देता तो जनतेसमोर उघड झाला आहे. मोदी सरकारला जेमतेम ४ महिनेच झाले असताना सोनिया गांधी यांनी मोदी यांच्याकडे हिशेब मागितल्याचे सांगून हा हिशेब २०१९ मधील निवडणुकीत भाजपा देशवासीयांसमोर मांडणार असल्याचे ते म्हणाले.जनतेने यापूर्वी मौनीबाबारूपी आघाडीच्या हातात सत्ता दिली होती. या वेळी मात्र जनतेने देशाला बोलणारा पंतप्रधान दिल्याचे सांगत मोदींनी परदेशात केलेल्या दौऱ्यांमुळे सुमारे ३ हजार विदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करणार असल्याने देशात रोजगारनिर्मितीचा दावा केला. मोदी सरकार देशाच्या सुरक्षिततेला महत्त्व देत असून आघाडीच्या काळात मात्र सुरक्षेसाठी असलेल्या साहित्य खरेदीसह विविध क्षेत्रांत लाखो कोटींचा घोटाळा झाला. त्या वेळी देशाचा विकास दर ८.४ टक्के होता, तो ४ महिन्यांत ४.२ टक्क्यांवर आला. शहा यांनी आपल्या भाषणात केवळ युती तुटल्याचा उल्लेख करीत काँग्रेस-राष्ट्रवादीखेरीज शिवसेनेवर कोणतीही टीका केली नाही. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रुढी यांनी केलेल्या भाषणात भाजपाला २५ वर्षांनंतर देशात संधी मिळाली असून राज्यातील यंदाच्या निवडणुकीत भाजपाचाच विजय होऊन मुख्यमंत्रीही याच पक्षाचा असणार असल्याचे भाकीत केले. प्रचार सभेदरम्यान मराठीला बगल देत हिंदी व गुजराती भाषांचा वापर करण्यात आल्याने मराठी बांधवांत नाराजी पसरली होती.
एकविसावे शतक हिंदुस्थानचे - अमित शहा
By admin | Updated: October 13, 2014 00:50 IST