Join us

दहिसरमध्ये सोळा गाड्यांची तोडफोड

By admin | Updated: October 11, 2016 03:57 IST

दहिसरमध्ये सोळा गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली

मुंबई : दहिसरमध्ये सोळा गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दीपक ब्रिस्ट (२०), अजय विश्वकर्मा ( २४) आणि निलेश मोरे (२३)अशी या आरोपींची नावे आहेत. ब्रिस्ट हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसरच्या चिरंजीवी हॉटेल परिसरात गाड्या उभ्या केल्या जातात. त्यात खासगी गाड्यांसह मोठे टेम्पो, टॅक्सी तसेच रिक्षांचा देखील समावेश आहे. ब्रिस्ट आणि त्याचे सहकारी या वाहनचालकांना धमकावून बळजबरीने पार्किंगचे पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे टोळके दारू पिण्यासाठी या ठिकाणी बसते. त्याला काही चालकांनी विरोध केला. त्या रागातून या तिघांनी रॉडने या गाड्यांची तोडफोड करत नुकसान केल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी सांगितले. रविवारी रात्री एक ते साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून अजूनही काही लोकांना अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)