- चेतन ननावरे, मुंबईदेशाच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयातर्फे २०११ साली करण्यात आलेल्या जनगणनेत ३१ हजार ८२५ मुंबईकरांनी आपला धर्मच सांगितलेला नाही. त्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या पाव टक्का (०.२५ टक्के) इतके आहे. त्यात १७ हजार १०० पुरुष आणि १४ हजार ७२५ महिलांचा समावेश आहे.जनगणनेतील लोकसंख्येची धर्मनिहाय आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यात मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले असून प्रत्येक तीन मुंबईकरांमागे दोन हिंदू नागरिक असल्याचे स्पष्ट होते. तर मुंबईतील ख्रिश्चन समाजाच्या लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांहून अधिक असल्याचे निदर्शनास आले.बहुसंख्य नागरिक असलेल्या हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन या धर्मांमध्ये मुंबईत सर्वाधिक संख्या हिंदूंची आहे. एकूण १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ लोकसंख्येमध्ये ८२ लाख १० हजार ८९४ हिंदू धर्मीय आहेत. हिंदूंपाठोपाठ मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि शीख धर्मीय मुंबईत राहत आहेत. राज्यासह देशात पुरुषांच्या तुलनेत असलेल्या स्त्रियांच्या जन्मदरात प्रचंड तफावत दिसत आहे. मात्र मुंबईत ख्रिश्चन धर्मातील स्त्रियांचे प्रमाण पुरुषांहून अधिक असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. तर मुंबई शहरात बौद्ध आणि जैन समाजातही पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक असल्याचे निदर्शनास आले.
पाव टक्का मुंबईकर निधर्मी
By admin | Updated: August 28, 2015 11:49 IST