Join us

पट चांगला पण मुख्याध्यापक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2015 00:20 IST

शहरी भागात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत असल्याने शिक्षण विभाग चिंतेत आहे.

अजित मांडके, ठाणे शहरी भागात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत असल्याने शिक्षण विभाग चिंतेत आहे. परंतु, दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या उत्तम असल्याची माहिती आगासन येथील शाळेकडे पाहिल्यावर मिळते. असे असूनही या शाळेला एक वर्षापासून मुख्याध्यापक नसल्याने शिक्षकांवर त्याचा अतिरिक्त भार पडला आहे.ठाण्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या आगासन येथे ही महापालिकेची शाळा आहे. या शाळेच्या दोन वर्गखोल्या गावात आणि दोन गावाबाहेर टेकाडावर भरविल्या जात आहेत. परंतु, या खोल्यांचे बांधकाम पक्के नसून पत्र्याच्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात. दोन सत्रांत ही शाळा भरविली जात असून येथे एकूण २३१ विद्यार्थी शिक्षण घेतात.येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा भरते. पहिलीला ३२, दुसरी- २८, तिसरी- ४१, चौथी- ३५, पाचवी- ३५, सहावी- ३२ आणि सातवीला ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली, दुसरी, पाचवी, सहावीचे वर्ग गावात तिसरी, चौथी, सातवीचे वर्ग गावाबाहेर भरतात. या शाळेत सात शिक्षक असून प्रत्येक वर्गाला एक शिक्षक आहे. परंतु, मागील एक वर्षापासून या शाळेला मुख्याध्यापक नसल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. मुख्याध्यापक मिळावे म्हणून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही मुख्याध्यापक मिळू शकले नाही. तसेच या संपूर्ण भागातच पाण्याची टंचाई असल्याने ही शाळाही त्यातून सुटू शकलेली नाही. परंतु, गावकऱ्यांच्या सहकार्याने येथे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. शाळेची इतरही काही किरकोळ दुरुस्तीची कामेही स्थानिक नगरसेवक आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून केली जात आहेत. ------------पट चांगला असला तरी वर्गखोल्यांची कमतरता असल्याने ही शाळा अर्धी गावात आणि अर्धी गावाबाहेर भरविली जात आहे. तसेच या शाळेला पाण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. परंतु, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे येथील विद्यार्थ्यांना किमान प्यायचे पाणी उपलब्ध होत आहे.