Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बारा डबा’ला ब्रेक?

By admin | Updated: March 23, 2016 03:59 IST

डीसी ते एसी परिवर्तन झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून हार्बरवर बारा डब्यांची लोकल धावण्यास सुरुवात होणार होती. मात्र डॉकयार्ड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामात अडथळे

मुंबई : डीसी ते एसी परिवर्तन झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून हार्बरवर बारा डब्यांची लोकल धावण्यास सुरुवात होणार होती. मात्र डॉकयार्ड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामात अडथळे येत असल्याने बारा डबा लोकल गाड्यांना ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बारा डब्यांची लोकल मे महिन्यापासून धावण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हार्बरवर बारा डब्यांची लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बारा डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येत असून सीएसटीतील याच कामासाठी मोठा ब्लॉकही घेण्यात आला होता. सीएसटीसह डॉकयार्ड स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबीही वाढविण्याचे काम सुरू होते. मात्र डॉकयार्ड स्थानकातील प्लॅटफॉर्मला लागूनच डोेंगराचा भाग असल्याने तो तोडूनच प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार आहे. परंतु हे काम पूर्ण झालेले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अन्य स्थानकातील कामे जरी पूर्ण झाली असली तरी डॉकयार्ड स्थानकातील काम पूर्ण झाल्याशिवाय बारा डब्यांची लोकल सुरू करणे शक्य नाही. बारा डब्यांची लोकल जरी सुरू केली तरी या स्थानकात दोन वेळा लोकलला थांबा द्यावा लागेल आणि ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले. तरीही हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर काम पूर्ण झाले नाही तर बारा डब्यांची लोकल एप्रिलऐवजी मे महिन्यापासून धावण्यास सुरुवात होईल. (प्रतिनिधी)