Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीबीएसई मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सीबीएसई मंडळाचा बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, याची राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप काहीच स्पष्टता नसल्याने विद्यार्थी, पालक गोंधळले असून ते निकालाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याने आता सीबीएसई, आयसीएसई दोन्ही मंडळांकडून निकाल जाहीर झाल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशातील सर्व राज्यांनी बारावीचे निकाल ३१ जुलै २०२१ पूर्वी लावावेत, अशा सूचना होत्या. मात्र, राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता काही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांना आणि शाळांना निकालाचे काम पूर्ण करण्यात मंडळाकडून विशेष वेळ देण्यात आला.

कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि प्राचार्यांकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे काम नुकतेच पूर्ण होत आहे. त्यानंतर मंडळ स्तरावरही निकालावर काही कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने निकाल पुढच्या म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

पदवी प्रवेशाची माहिती अपेक्षित

बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी यंदा काय प्रवेश पद्धती वापरली जाणार? पारंपरिक प्रवेशांसाठी सीईटी घेतली जाणार का? पदवी प्रवेश हे नेहमीप्रमाणे बारावीच्या गुणांवर आधारित होतील? व्यवसायिक प्रवेशांसाठीची एमएचटी सीईटी कधी घेतली जाणार? त्याचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, असे अनेक प्रश्न सध्या विद्यार्थी, पालकांच्या मनात आहेत. त्यामुळे बारावीचा निकाल लवकर लावून पदवी प्रवेशांचा आणि त्याच्या कार्यपद्धतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी ते करत आहेत.