Join us
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यामुळे एसटी सेवा बंद

By admin | Updated: June 14, 2015 23:24 IST

तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून कळंब-पाषाणे या रस्त्याची ओळख आहे. खराब रस्त्यामुळे कर्जत एसटी आगाराने या ठिकाणी सुरू असलेली एसटी सेवा बंद केली

कर्जत : तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून कळंब-पाषाणे या रस्त्याची ओळख आहे. खराब रस्त्यामुळे कर्जत एसटी आगाराने या ठिकाणी सुरू असलेली एसटी सेवा बंद केली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी आता सर्वपक्षीय आंदोलन उभे करण्याचा इशारा शेकापचे तालुका चिटणीस सुदाम पेमारे यांनी दिला आहे. प्रसंगी कर्जत - कल्याण मार्गावर रास्ता रोको करू असे ही त्यांनी सांगितले. बारा किलोमीटरच्या रस्त्यासाठी अर्थसंकल्पामधून निधी मंजूर झाला आहे, परंतु गेली चार महिने या रस्त्याचे टेंडर होऊ शकले नाही. त्यामुळे एसटी सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कळंब -पाषाणे - वांगणी हा रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र त्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग निधी खर्च करीत असल्याने रस्ता सुरू आहे. परंतु अखंड रस्ता तयार करण्यासाठी बांधकाम विभागाने एकदाही निधी खर्च न केल्यामुळे आता रस्ता शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे कर्जत एसटी आगाराने या मार्गावर धावणाऱ्या एसटी गाडीची सेवा तात्पुरती बंद ठेवली आहे. परिणामी विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे नुकसान होत आहे. पहाटेच्या वेळी अनेकांना वांगणी येथे लोकल पकडण्यासाठी जाताना पायी प्रवास करावा लागत आहे. ही अडचण आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आणणारी आहे. या भागातील जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी पाषाणे ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन शेळके,अनिल खाडे यांच्यासह कर्जत एसटी आगारप्रमुख डी.एस. देशमुख यांची भेट घेऊन त्यांना एसटी सेवा सुरु करण्याची मागणी केली.एसटी आगारप्रमुख देशमुख यांनी रस्त्याची किमान डागडुगी केल्यास गाडी सुरू करता येईल असे आश्वासन दिले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग पंधरा दिवसांपासून रस्त्याची दुरु स्ती करण्याबाबत केवळ गप्पा मारत आहे. परंतु कोणतीही कार्यवाही करत नसल्याने आता रस्त्याच्या कामासाठी आंदोलन उभे करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी दिला आहे. (वार्ताहर)