Join us

एलईडी कंपन्यांची दलाली बंद करा

By admin | Updated: July 6, 2015 02:46 IST

भाजपाने एलईडी दिव्यांसाठीचा आग्रह सोडावा, ही मागणी करतानाच एलईडी कंपन्यांची दलाली करु नये, असा टोला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी हाणला.

मुंबई : मरिन ड्राईव्हवरील एलईडी दिव्यांच्या निमित्ताने भाजपा-शवसेनेतील वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. भाजपाने एलईडी दिव्यांसाठीचा आग्रह सोडावा, ही मागणी करतानाच एलईडी कंपन्यांची दलाली करु नये, असा टोला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी हाणला. मरीन ड्राईव्हवर लावण्यात आलेले एलईडी दिवे अयोग्य असून त्याऐवजी पूर्वीप्रमाणे सोडियम दिवे लावावेत, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींनी केली. त्यामुळे एलईडी दिव्यांचा भाजपचा आग्रह चुकीचा असल्याचे सिध्द झाले असल्याचे निरुपम यांनी सांगितले. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार एलईडी दिव्यांचा फार आग्रह करत आहे, या दिव्यांच्या माध्यमातून देशाला लुटण्याचा हा प्रकार असल्याचाही आरोप निरुपम यांनी केला. आधीचे सोडियम दिवे काढून एलईडी दिवे लावण्यात आले. ते काढून सोडियम दिवे लावण्यात येतील. या सा-या प्रकारात कोट्यवधी रुपयांची नासाडी होणार आहे. जनतेच्या करामधून मिळणा-या या पैशाची ही उधळपट्टी आहे. एलईडी दिव्यांचा आग्रह धरणारे केंद्रीय उर्जा मंत्री पीयुष गोएल यांच्याकडून हा खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे. मरिन ड्राईव्ह येथे एलईडी दिवे बसविण्याच्य मुद्यावरुन भाजपा आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली होती. एलईडी दिव्यांचा निर्णय घेताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत प्रथम श्विसेनेने या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. तरीही भाजपा नेत्यांनी हा प्रकल्प रेटून नेत मरिन ड्राईव्हवर एलईडी दिवे बसविले. एलईडी दिव्यांमुळे मरिन ड्राईव्हची झळाळी कमी झाल्याचा आरोप युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला होता. आता न्यायालयानेच पुर्वीप्रमाणेच सोडीयम दिवे लावण्याच्या सूचना दिल्याने भाजपाची कोंडी झाली आहे.