Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे उड्डाणपुलाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: May 16, 2014 02:34 IST

तुर्भेमधील उड्डाणपुलाखाली अवैध वाहनतळ निर्माण करण्यात आला आहे.या जागेचा रेती व खडीच्या व्यवसायासाठीही वापर करण्यात येत आहे.

नवी मुंबई : तुर्भेमधील उड्डाणपुलाखाली अवैध वाहनतळ निर्माण करण्यात आला आहे. या जागेचा रेती व खडीच्या व्यवसायासाठीही वापर करण्यात येत आहे. पुलाची सुरक्षा धोक्यात आली असून महापालिकेचा शहर अभियंता विभाग या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यास न्यायालयाने बंदी केली आहे. शासनानेही पुलाखालील जागेचा दुरुपयोग थांबविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. परंतु यानंतरही अनेक ठिकाणी पुलाखाली झालेले अतिक्रमण थांबविण्यात येत नाही. तुर्भे पुलाचीही अशीच स्थिती आहे. एनएमएमटी डेपो व जनता मार्केटच्या मध्ये असणार्‍या या पुलाखाली मोठ्याप्रमाणात टेंपो, ट्रक व इतर वाहने उभी केली जात आहेत. येथे दोन ठिकाणी गॅरेज सुरू असून वाहन दुरुस्तीचे काम सुरू आहे. रेती व खडीही याठिकाणी टाकली आहे. पुलाखाली मोठ्याप्रमाणात कचर्‍याचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. अनधिकृत वाहनतळामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुर्भे विभाग कार्यालयाने जवळपास सहा वेळा येथे कारवाई केली आहे. कारवाई करून वाहने हटविली जातात. येथील बांधकाम व विटांचा कारखाना बंद पाडला आहे. परंतु कारवाई झाली की दुसर्‍या दिवशी पुन्हा वाहने उभी रहात आहेत. हे अतिक्रमण थांबविण्यासाठी येथे संरक्षण जाळी बसविणे आवश्यक आहे. विभाग कार्यालयाने तसे पत्र अभियांत्रिकी विभागास दिले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)