Join us

एसटी डेपोची रोकड लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 7, 2015 01:07 IST

खोपट येथील एसटी डेपोमधील वाहकांच्या सामान ठेवण्याच्या बॉक्सची साखळी तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या राजेश रॉय (२९) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली.

ठाणे : खोपट येथील एसटी डेपोमधील वाहकांच्या सामान ठेवण्याच्या बॉक्सची साखळी तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या राजेश रॉय (२९) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा ५० लाखांचा धनादेश आणि ९ लाखांची रोकड दुसऱ्या कॅश रूममध्ये असल्याने ती त्याच्या हाती लागण्याच्या आतच तो पकडला गेला.डेपो क्रमांक २मध्ये ५ मार्चला रात्री १० वा.च्या सुमारास राजेश शिरला. वाहकांचे सामान ठेवण्याच्या लोखंडी बॉक्समध्ये रोकड असावी, अशी शक्यता गृहीत धरून त्याने त्याची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. त्याच आवाजामुळे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. नंतर त्याला गस्तीवरील वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक एम. बी. थोरवे यांनी दिली. रोकड आणि धनादेश सुरक्षित असल्याचे ठाणे आगार २चे व्यवस्थापक शिवाजी देवकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पकडलेला संशयित राजेश हा पूर्वी आगाराच्या बाजूला असलेल्या सीएनजी पंपावर काम करीत होता. सध्या तो बेरोजगार आहे. तो व्यसनाधीन झाला आहे. (प्रतिनिधी)