नवी मुंबई : कामोठे येथील ज्वेलर्समध्ये जबरी चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दुकानातील कामगारांनी त्यांना प्रतिकार केल्याने त्यांनी पळ काढला होता.कामोठे सेक्टर १९ येथील कलश ज्वेलर्समधे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला होता. दुकानात दोन कामगार एकटेच असल्याची संधी साधून तीन व्यक्ती ग्राहक बनून तेथे आल्या. दुकानाची टेहाळणी केल्यानंतर त्यांनी आपल्याकडील चाकू काढून दुकानातील राजेंद्रसिंह खरवट व नरेश खरवट यांना धमकावले. शिवाय दुकानाचे शटर आतून बंद करुन दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र यावेळी दोघा खरवट बंधूंनी त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूचे वार करुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी सोन्याच्या दुकानात घडत असलेल्या प्रकाराची चाहूल लागताच लगतच्या नागरिकांनीही खरवट यांच्या मदतीला धाव घेतल्याने नानसिंग (२८) याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे कलश ज्वेलर्सवर पडणारा दरोडा टळला आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी भैरवनाथ याला तुर्भे येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)