Join us

अर्नाळा बंदरासाठी पुन्हा प्रयत्न

By admin | Updated: June 12, 2014 02:07 IST

अर्नाळा येथे बंदर बांधण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू झाला आहे. हे बंदर बांधणाऱ्या ठेकेदाराने रात्रीच्या वेळी बांधकाम साहित्य टाकण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला.

वसई : अर्नाळा येथे बंदर बांधण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू झाला आहे. हे बंदर बांधणाऱ्या ठेकेदाराने रात्रीच्या वेळी बांधकाम साहित्य टाकण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे ठेकेदारांच्या माणसांना माघार घ्यावी लागली. या घटनेनंतर शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अर्नाळा गावातील सहा मच्छिमार सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले. परंतु या बैठकीकडे चार सोसायट्यांचे पदाधिकारी फिरकलेच नाहीत. दरम्यान मच्छिमार स्वराज्य समितीने स्थानिक मच्छिमारांचा विरोध डावलून बंदर उभारण्याचा प्रयत्न झाल्यास गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, असा इशारा दिला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून अर्नाळा येथे अद्ययावत बंदर उभारण्याचा तीन वर्षापूर्वी निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ठेकेदाराने काम सुरू केले. परंतु स्थानिक मच्छिमारांनी तसेच ग्रामसभेने विरोध केल्यामुळे शासनाने आपल्या निर्णयास स्थगिती दिली. ग्रामसभेमध्ये याविषयी ठराव आला असता बंदर उभारण्याच्या निर्णयाला बहुमतांनी विरोध करण्यात आला. शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नामुळे अर्नाळा गावात पुन्हा आंदोलने, धरणे, घेराव इ. आंदोलनात्मक घटना घडण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अर्नाळा परिसरातील सहा मच्छिमार सोसायट्यांना चर्चेसाठी मुंबईस्थित कार्यालयात पाचारण केले. मात्र या बैठकीस दर्यासारंग मच्छिमार सोसायटी अर्नाळा बंदरपाडा, व सागरपुत्र मच्छिमार सोसायटी अर्नाळा किस्सा या दोन मच्छिमार सोसायटी वगळता अन्य चार सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. यासंदर्भात मच्छिमारांच्या मच्छिमार स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल म्हणाले, शासनाने बळजबरी बंदर बांधण्याचा निर्णय लादल्यास आम्ही प्राणपणाने विरोध करू. शासनाने आत्मघातीपणा करू नये, केल्यास मच्छिमार कुटुंबासह रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला.