नागोठणे : भरधाव वेगात ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने ट्रक पलटी झाला. आगीचा भडका उडून मोटारसायकलस्वार आगीत जळून खाक झाला. तर ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अपघातात दोन्ही वाहने जळाली असून सोमवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीनजीक ही दुर्घटना घडली. सोमवारी रात्री ट्रक धाटाव, रोहे येथून शुद्ध पाण्याच्या बाटल्या भरून औरंगाबादकडे जात होता. तर पल्सर मोटारसायकल ऐरोली, नवी मुंबईकडून चिपळूणकडे जात होती. दोन्ही वाहने सुकेळी खिंडीनजीक आल्यानंतर खिंडीतून वेगात खाली उतरणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्याने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली व ट्रक रस्त्याच्या खाली पलटी झाला. त्याच दरम्यान कोणत्यातरी एका वाहनाला आग लागून आगीने रौद्ररूप धारण केले व दोन्ही वाहने आगीने वेढली गेली. ट्रकचालक महमद अली अबू शेख (५०, रा. पैठण, औरंगाबाद) ताबडतोब आगीतून बाहेर आल्याने तो बचावला, तर सूरज मोरे (२८) आणि प्रशांत परीट (२७, दोन्ही ऐरोली, नवी मुंबई) हे दोघे मोटारसायकलस्वार आगीच्या भक्षकस्थानी पडून मृत्यू पावले. आगीनंतर नागोठणे पोलिसांनी तातडीने येथील रिलायन्स आणि सुप्रीम पेट्रोकेम या दोन कंपन्यांच्या अग्निशमन दलाला अपघातस्थळी पाचारण केले होते, मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
ट्रक - मोटारसायकल अपघातात दोन ठार
By admin | Updated: June 10, 2015 02:32 IST