Join us  

चार वाहनांना धडक देत ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:17 AM

मुंबई : वाळूने भरलेला ट्रक उतारावरुन खाली येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. आणि ट्रक सिग्नलच्या पोलला धडकला.

मुंबई : वाळूने भरलेला ट्रक उतारावरुन खाली येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. आणि ट्रक सिग्नलच्या पोलला धडकला. तेथे उभ्या असलेल्या चार कारला उडवून पुढे १० फुटाच्या अंतरावर तो उलटल्याची घटना विक्रोळी- जोगेश्वरी लिंक रोडवर बुधवारी सकाळी पावणेआठला घडली. या विचित्र अपघातात चार कारचे नुकसान झाले आहे. तसेच वाळू रस्त्यावर पडल्याने जवळपास अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली आहे.वसई- नायगाव येथून वाळूचा ट्रक घेऊन राधेश्याम यादव (२६) विक्रोळी- जोगेश्वरी लिंक रोड मार्गे पुढे निघाला. उतारावरुन खाली येत असताना यादवचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले. खाली सिग्नल लागल्याने काही वाहने सिग्नलच्या अलीकडे थांबली होती. यादवने सिग्नलच्या पोलवर गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र ट्रक थांबला नाही. सिग्नलला उभ्या असलेल्या चार कारला धडकून तो पुढे १० फुट अंतरावर जाऊन दुभाजकावर चढला. आणि सिप्झ कंपनीच्या गेट क्रमांक ३ च्या समोर तो उलटल्याने संपूर्ण वाळू रस्त्यावर पडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील वाळू काढण्यास सुरुवात केली. या विचित्र अपघातात चार कारचे नुकसान झाले आहे. अर्धा ते पाऊण तासानंतर येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यास पोलिसांना यश आले.यादवने पोलिसांना दिलेल्या माहितीत ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले. आणि गाडी थांबविण्यासाठी सिग्नल पोलचा आधार घेतल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणात आरटीओची मदत घेण्यात येत आहे. ब्रेक फेल होता की नाही? याबाबतचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी डायरी नोंद करत अधिक चौकशी सुरु असल्याचे सांगितले. यामध्ये कोणीही जखमी नाही. तसेच चालकही दारुच्या नशेत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहेत.

टॅग्स :अपघात