पनवेल : सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे आज ट्रकचा मोठा अपघात झाला. पुण्याच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या (एमएच ०६, एफ ३८९४) या ट्रकला शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास अपघात होऊन हा ट्रक कोपरा खाडीत कोसळला. सुदैवाने कोळी बांधवांनी वेळीच धाव घेत होडीच्या सहाय्याने या ट्रकमधील तिघांना सुखरूप बाहेर काढले. वाहनचालक अब्दुल रहिम खान, क्लीनर किसन घोडगे, अफजल चौधरी हे तिघेजण या ट्रकमध्ये होते. सायन - पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू असताना संरक्षक भिंत उभारण्याचे काम अर्धवट ठेवल्यामुळे हा अपघात घडला. खाडीत भरती असल्यामुळे ट्रक १०० फूट पाण्यात वाहत गेला. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरिधर, रवींद्र बडगुजर, कामोठ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी घटनास्थळी भेट दिली. महिन्याभरापूर्वीच एका चारचाकी वाहनाला या ठिकाणी अपघात झाला ज्यात वाहनचालकाला आपला जीव गमवावा लागला होता. याच गाडीतील दोघांना प्रत्यक्षदर्शींनी सुखरूपपणे बाहेर काढले होते. शनिवारी कळंबोली वाहतूक शाखेच्या मदतीने या ट्रकला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)
कोपरा खाडीत ट्रक कोसळला
By admin | Updated: March 1, 2015 00:36 IST