Join us  

जीम बंद असल्याने सायकलींच्या विक्रीत तिपटीने वाढ; दुकानदारांना सुखद अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:59 AM

उत्पादन मंदावले, मात्र दरवर्षीच्या पावसाळ्याच्या तुलनेत या वेळी चांगली मागणी

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात जीम बंद असल्याने सायकलींचा वापर वाढला असून मुंबईत सायकलींच्या विक्रीत तिपटीने वाढ झालीआहे. मुंबईत सायकल विक्रीची दुकाने १५ मार्चपासून बंद होती ती ६ जूनपासून सुरू करण्यात आली आहेत. जवळपास पावणेतीन महिने बंद असलेल्या व्यवसायाला कशी गती येईल, असा सायकल दुकानदारांसमोर मोठा प्रश्न होता. परंतु त्यांना सुखद अनुभव आला.

पहिल्या दिवसापासूनच सायकलींची मागणी वाढली. दरवर्षी जूनमध्ये सायकल विक्रीचा धंदा मंदा असतो. पावसाळ्यात सायकलींची विक्री घटते. मात्र सध्या दुकानदारांना उत्साहवर्धक अनुभव येत आहे. चेंबूरमध्ये राहणारे अजित दामले यांनी सांगितले की, आधी मी पायी फिरण्याचा व्यायाम करायचो. आता कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ते टाळून सायकल चालवतो. त्यासाठी नवीन सायकल खरेदी केली. सायकलिंगमुळे शारीरिक अंतरदेखील व्यवस्थित पाळले जाते. आगरीपाडामध्ये राहणारे जाफरभाई पोरबंदरवाला आधी रेसकोर्सवर सकाळी फिरायला जायचे, पण आता ते बंद आहे. घराजवळील स्विमिंग पूलही बंद आहे, त्यामुळे त्यांनी सायकलिंगाचा पर्याय निवडला आहे.किमतीमध्ये पाच ते दहा टक्के वाढमरिन लाइन्समध्ये सायकल विक्रीचे जुने दुकान चालविणारे सुदर्शन बेरी यांनी सांगितले की, साडेपाच हजारांपासून आठ लाखांपर्यंतच्या सायकलींची विक्री आम्ही करतो. एकीकडे सायकल उत्पादक कंपन्यांचे उत्पादन मंदावले आहे. दुसरीकडे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशी बनावटीच्या सायकली लुधियानाहून येतात तर इम्पोर्टेड सायकली वेगवेगळ्या देशांमधून येतात. लॉकडाऊनचा काळ आणि सायकलींची वाढलेली विक्री यामुळे किमतीमध्ये पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या