मुंबई : सोन्याचे बिस्कीट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि व्यवहारावेळी पोलीस असल्याचे भासवून सोने व रोकड घेऊन पसार होणाऱ्या त्रिकूटाला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. रोशण द्वारकानाथ यादव, इक्बाल अन्सारी व संतोष पटेल अशी या ठकसेनांची नावे आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माटुंगा परिसरातील एका व्यावसयिकाला सोन्याचे बिस्कीट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून या त्रिकूटाने १ लाख रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे धनंजय देवाडीकर, उपनिरीक्षक शिंदे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा यादव पोलिसांच्या हाती सापडला. त्याच्याकडील चौकशीत अन्सारी, पटेलसह हरिश नामक तरुणाचे नाव समोर आले होते. पोलिसांनी सापळा रचून या यादवपाठोपाठ अन्सारी व पटेलला अटक केली. या त्रिकूटाकडून ३७ हजार ५ रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले; तर हरिशचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
व्यावसायिकाला लुबाडणारे त्रिकूट गजाआड
By admin | Updated: September 20, 2015 00:20 IST