Join us  

यात्रेतून सावरकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 1:17 AM

पथनाट्य, घोषणा, भव्य फलक, चित्ररथ आदींच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५४व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधत, बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आणि त्यांच्या विचारांचा जयघोष करणारी अभिवादन यात्रा दादर परिसरातून काढण्यात आली होती. या वेळी पथनाट्य, घोषणा, भव्य फलक, चित्ररथ आदींच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी बाबाराव सावरकर चौकातील फलकाला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. वीर कोतवाल मार्गे ही अभिवादन यात्रा शिवसेना भवनकडे निघाली. यात नागरिकांनी सहभाग देऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. शिवसेना भवनच्या समोरच्या चौकात रॅली पोहोचल्यानंतर पथनाट्याचे आयोजन केले गेले. त्यातून स्वातंत्र्यवीरांचा जयघोष केला गेला.रणजित सावरकर यांनी संबोधित केले. ते म्हणाले, देशाच्या विरोधकांचा सामना करण्यासाठी आपण खंबीर आहोत, पण देशाच्या आत असलेल्या विरोधकांना समज देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. खिलाफत चळवळीला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली असून, त्यावेळी केलेली कृती देशविघातक कशी ठरली, हे ध्यानात ठेवून त्यांनी नागरिकांना यापुढील काळात देशविरोधी विचार आणि कृती करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन केले. त्यानंतर, ही रॅली केळुस्कर मार्गे स्मारकात पोहोचल्यावर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.

टॅग्स :विनायक दामोदर सावरकर