Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित

By admin | Updated: June 6, 2016 02:49 IST

पालघर जिल्ह्यातील डहाणू या आदिवासी तालुक्यात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याची धक्कादायक बाब शिक्षक परिषदेने उघडकीस आणली आहे

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू या आदिवासी तालुक्यात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याची धक्कादायक बाब शिक्षक परिषदेने उघडकीस आणली आहे. तरी उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने या विभागात महाविद्यालये सुरू करण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू हा संपूर्णपणे आदिवासी तालुका आहे. या ठिकाणी ४७१ प्राथमिक, ४८ माध्यमिक, १५ आश्रमशाळा आणि ३ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. मात्र संपूर्ण तालुक्यात पदव्युत्तर शिक्षणाची सोय नसल्याने पदवीधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर तालुक्यांत जावे लागते. ते परवडत नसल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. डहाणू तालुक्यात दहावी इयत्तेत सुमारे ४ हजार ५००, तर बारावीला ३ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसत असून, तालुक्याचा निकाल सुमारे ८५ टक्के लागतो. त्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सामावून घेण्याची क्षमता तालुक्यातील महाविद्यालयांत नाही. परिणामी, बहुसंख्य मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)