Join us

त्या आदिवासी मुलाचा ‘शौर्य पुरस्काराने’ गौरव

By admin | Updated: February 20, 2015 22:58 IST

मुरुड तालुक्यातील ताडवाडी येथील नऊ वर्षीय आदिवासी समाजातील मुलाने गेल्या पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी पोहायला गेलेल्या तीन मुलींना वाचविले.

बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील ताडवाडी येथील नऊ वर्षीय आदिवासी समाजातील मुलाने गेल्या पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी पोहायला गेलेल्या तीन मुलींना वाचविले. त्यांच्या पराक्रमाचे कौतुक सर्वत्र केले जात होते, मात्र जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मात्र स्थानिकांनीच त्याचे अनन्यसाधारण कौशल्य बघून शौर्य पुरस्कार प्रदान करीत गौरव केला.चेहेर येथील शिवसेना पुरस्कृत भगवा चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मुरुड तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिप सदस्य महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमित पवार याने दाखविलेल्या पराक्रमाचा कौतुक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी अमित पवार याचा गौरव करीत त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन त्यांनी दाखविलेल्या साहसाचे कौतुक केले. नऊ वर्षीय लहानग्या अमित पवार याचे ताडवाडी येथील आदिवासीवाडीवर घर असून तो वळके येथील को.ए.सो.च्या नारायण गायकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. गेल्या पावसाळ्यातील एका रविवारी डोंगरात असलेल्या आजीकडे अमित पवार हा डोहाच्या बाजूने जात असताना त्या डोहात तीन मुली बुडताना पाहिले असता त्यांनी जीवाची पर्वा न करता त्याने पाण्याच्या डोहात उडी मारून तिन्ही मुलींना वाचविले. त्याच्या साहसाची बातमी मुरुड तालुक्यासहित सर्वत्र जिल्ह्यात पसरली. (वार्ताहर)