Join us  

आरक्षित डब्यात घुसखोरी; ४६ हजारांचा दंड, मध्य रेल्वेकडून ३११ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 2:00 PM

Central Railway: आरक्षित डब्यातून घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेकडून बुधवारपासून नाईट कोर्ट मोहीम राबविण्यात येत आहे.  रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरोधात आरपीएफने  ३११ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

मुंबई - आरक्षित डब्यातून घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेकडून बुधवारपासून नाईट कोर्ट मोहीम राबविण्यात येत आहे.  रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरोधात आरपीएफने  ३११ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून ४६ हजार ९५० रुपये दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मुंबई विभागाच्या आरपीएफ पोलिसांनी संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी नाईट कोर्ट मोहीम बुधवारी हाती घेतली होती. कल्याण, टिटवाळा, बदलापूर, पनवेल, ठाणे, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली या स्थानकांवर ही मोहीम   राबविण्यात आली होती. 

 यामध्ये आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल कलम १५५ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत १९७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कलम १४७ नुसार रेल्वे परिसरात घुसखोरी केल्याप्रकरणी ९९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रेल्वे परिसरात अनधिकृतपणे फेरी मारणे आणि भीक मागणे यासाठी कलम १४४ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत १३ जणांवर गुन्हा दाखल. रेल्वे परिसरात मद्यपान करून उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल. 

विशेष म्हणजे कल्याण येथील विभागीय रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या रात्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकूण ३११ व्यक्तींवर खटला चालविला गेला, ज्यामधून एकूण ४६ हजार ९५० रुपये दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वे