Join us  

मेट्रो कारशेडसाठीची वृक्षतोड कायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 6:29 AM

पालिकेचे समर्थन; प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजूर केल्याचे स्पष्टीकरण

मुंबई : आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी करण्यात आलेली वृक्षतोड कायदेशीर असल्याचे मत व्यक्त करीत पालिका प्रशासनाने त्याचे समर्थन केले आहे. मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड करण्याबाबतचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता, असे मंगळवारी प्रशासनाने स्थायी समितीसमोर स्पष्ट केले आहे.

मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी झाडांची कत्तल करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेली मंजुरी चुकीची असून तज्ज्ञांची मते जाणून घेतेली नाहीत, असा आरोप सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी, स्थायी समितीच्या मागील बैठकीत केला होता. कारशेड व वृक्षांच्या कत्तलीबाबत लाखभर नागरिकांनी नोंदविलेल्या हरकती, सूचनांचा विचार केला नाही. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालनही करण्यात आलेले नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.

मात्र, मेट्रो कारशेडसाठी ३,६९१ पैकी २,१८५ वृक्ष तोडणे, ४६१ वृक्ष पुनर्रोपित करणे, १,०४५ वृक्ष जसेच्या तसेच ठेवणेबाबतच्या प्रस्तावाला २९ आॅगस्ट रोजीच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणून दिले. ७६,३४३ हरकती-सूचनांचे वर्गीकरण करून त्याबाबत खुलासाही केला होता. वृक्षतोडसाठी दिलेली परवानगी ही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करूनच दिली होती. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही, असे प्रशासनाने सांगितले.‘उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन’मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडस देण्यात आलेली परवानगी ही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करूनच देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही, असे पालिका प्रशासनाने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले.

टॅग्स :आरे