Join us  

माथेरानमध्ये फिरा, स्वस्तात पॉड हॉटेलमध्ये मुक्काम करा!, मध्य रेल्वेचा संकल्पित प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:44 PM

Matheran News: पर्यटकांसाठी मुंबईनजीक पसंतीच्या अशा माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी व निसर्गाच्या सानिध्यातील रम्य पर्यटनस्थळी आता स्वस्त अशी पॉड हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मुंबई : पर्यटकांसाठी मुंबईनजीक पसंतीच्या अशा माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी व निसर्गाच्या सानिध्यातील रम्य पर्यटनस्थळी आता स्वस्त अशी पॉड हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. महागड्या निवासव्यवस्थेमुळे अनेक नागरिकांना माथेरानच्या सूर्योदयाला वा सूर्यास्ताच्या दर्शनाला मुकावे लागते, ते या मध्य रेल्वेच्या पॉड हॉटेल व स्लीपिंग पॉड प्रकल्पामुळे दिलासा देणारे ठरणार आहे.

मुंबई सेंट्रल स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आलिशान पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्यात आले आहे. त्याला प्रवाशांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. तो पाहून मध्य रेल्वेने माथेरानमध्ये मोठा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधात नियोजनही झाले असून २५ सप्टेंबरला या पॉड प्रकल्पाच्या उभारणीसाठी ऑनलाइन निविदासुद्धा काढण्यात येणार आहे. प्रस्तावित स्लीपिंग पॉड्स आणि पॉड हॉटेलमध्ये सर्व आवश्यक आणि आधुनिक सुविधा असतील. परवानाधारकांना माथेरानला स्लीपिंग पॉड/स्विस कॉटेज तंबू किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या तंबू खोल्या/घर किंवा कॉटेज विकसित किंवा व्यवस्था करण्याची परवानगी आहे. रेल्वे स्थानकावरील स्लीपिंग पॉड्सचा विकास आणि संचालनाची जबाबदारी आणि त्यासाठीचा संपूर्ण खर्च परवानाधारकाद्वारे उचलला जाणार आहे.

असे असेल पॉड हॉटेल या उत्तम वातानुकूलित निवास पॉड हॉटेलमध्ये मोबाइल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सुविधा, फायर अलार्म, इंटरकॉम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम इ. आहेत. या पॉड्सचे बुकिंग फिजिकल मोड (रिसेप्शन) व मोबाइल ॲपवर ऑनलाइन होऊ शकेल.

सर्वात मोठे पॉड हॉटेल  माथेरानमधील ७५८.७७ चौरस मीटर जागेवर हे पॉड हॉटेल उभारण्यात येणार आहे.   विशेष म्हणजे सीएसएमटी व मुंबई सेंट्रल स्थानकावरील  पॉड हॉटेलपेक्षा माथेरान तिप्पट मोठे हॉटेल असणार आहे.   यामध्ये शंभर पेक्षा जास्त पॉड्स असतील. तसेच सिंगल पॉड्स, दुहेरी पॉड्स आणि फॅमिली पॉड्स यासारखे सर्व वर्गवारीसाठी हे पॉड हॉटेल असेल. 

माथेरानला अनेकजण सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यासाठी जातात. यासाठी तिथे मुक्काम करावा लागतो. मात्र, तेथील तेथील मुक्कामासाठी हॉटेलचे दर परवडणारे नाहीत. सुट्ट्यांच्या हंगामात दर वाढ करून लूट होते.  रेल्वेने ही सुविधा सुरू केल्यास पर्यटकांना स्वस्त दरात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील.- संतोष पाटील, पर्यटक 

टॅग्स :माथेरानमध्य रेल्वे