Join us  

'जुहू बीच'ची झाली कचराकुंडी, प्लास्टीसच्या बाटल्या अन् पिशव्यांचा ढीग  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 3:48 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात स्वच्छतेसाठी आग्रही असताना मुंबई महानगरपालिकेनेच त्यांच्या स्वच्छ भारत अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - राज्य शासनाने प्लास्टिक बंदी गेल्या 23 जून रोजी लागू केली. मात्र, नेमेची मग येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे गेल्या 8 दिवसांपासून जुहू बीचच्या जुहू कोळीवाड्यात सुमारे 1.50 ते 2 टन इतका कचरा जमा झाला आहे. त्यामध्ये प्लास्टिकचा भरणा मोठा आहे. मुंबई महानगर पालिकेला नावलौकिक आहे. पालिकेने या बीचची रोज स्वच्छता केली पाहिजे. पण, जुहू बीचच्या स्वच्छतेचे करोडो रुपयांचे कंत्राट घेणारे स्पेक्ट्रॉन या कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सी गार्डिंयन या संस्थेचे अध्यक्ष सुनील कानोजिया यांनी लोकमतशी बोलताना बोलताना केला आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात स्वच्छतेसाठी आग्रही असताना मुंबई महानगरपालिकेनेच त्यांच्या स्वच्छ भारत अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळ्यात समुद्र हा खवळलेला आहे. त्यातच आलेल्या वायू वादळाने समुद्र हा कचरा व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक समुद्र किनाऱ्यावर फेकत आहे. त्यामुळे येथे गेल्या 8 दिवसात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक व इतर कचरा जमा झाला असून, जुहू बीचची जणू कचराकुंडीच झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने समुद्राच्या पोटात असलेला कचरा समुद्र मोठ्या प्रमाणत बाहेर फेकत असतो, त्यात प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात असते अशी माहिती त्यांनी दिली.विलेपार्ले बस स्थानकापासून सरळ 10 मिनिटे चालत गेल्यावर सुमारे 1.5 किमीचा जुहू सिल्व्हर बीच लागतो. गेल्या वर्षी जुहू सिल्व्हर बीच हा पूर्णपणे कचऱ्याने अस्वच्छ झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाळूत सुमारे 2 ते 3 फूट पाय खोल जाईल इतका 100 डंपर कचरा व प्लाटिक मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या कचऱ्याची व प्लास्टिकची वाळूत रुतून आता पेस्ट झाली आहे. त्यामुळे येथे बीचवर चालायला जागाच शिल्लक राहिली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या वर्षी जुहू सिल्व्हर बीचच्या झालेल्या कचराकुंडीमुळे अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शबाना आझमी, जीनत अमान, राज कुंद्रा आणि अन्य सेलिब्रिटी व उद्योगपती यांच्यासह रोज येथे सकाळ व संध्याकाळी येणाऱ्या बीच वॉकर्सने पाठ फिरवल्याची माहिती कानोजिया यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेला नावलौकिक आहे. पालिकेने या बीचची रोज स्वच्छता केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

गेल्या वर्षी लोकमतनेही येथील सिल्व्हर बीचच्या कचऱ्याच्या समस्येविरोधात ऑनलाईन लोकमत व वर्तमानपत्रातून सातत्याने आवाज उठवला होता. लोकमतच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. गेली 11 वर्षे रोज सकाळी ते बीचवर येतात आणि सोशल मीडियावरून जुहूच्या सिल्व्हर बीचची आजची सद्यस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओ आणि फोटोद्वारे थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना देत असतात. आज खास लोकमतच्या सदर प्रतिनिधीला सकाळी 7.15 वाजता त्यांनी या बीचची विदारक स्थितीची सविस्तर माहिती दिली.  

टॅग्स :मुंबईसागरी महामार्ग