Join us

परीक्षेआधी वाहतूककोंडीचा पेपर

By admin | Updated: February 24, 2015 00:36 IST

शहरातील मुख्य मार्गावर व विद्यालयांच्या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाट काढून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांची व

भिवंडी : शहरातील मुख्य मार्गावर व विद्यालयांच्या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाट काढून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची दररोज दमछाक होत आहे. त्यामुळे शहरात सकाळी ९ ते ११ दरम्यान अवजड वाहनांना सक्तीने प्रवेशबंदी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची मागणी शहरातील पालकवर्ग करीत आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य ठरविणारी बारावीची परीक्षा शनिवारपासून सुरू झाली. त्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक त्यांना किमान सुविधा देण्यासाठी झटत असतात. या वर्षी शहरातील परीक्षा केंद्रांत वाढ झाल्याने काही पालकवर्गाला अनोळखी मार्गावरून पाल्याला पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. बोर्डाच्या परीक्षेची माहिती रस्त्यावरील प्रवासी वाहनांना व इतर व्यावसायिक वाहनांच्या चालकांना नसल्याने ते नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त रस्ता व्यापून वाहतूककोंडी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांत परीक्षा देण्यासाठी जाण्याअगोदर वाहतूककोंडीची परीक्षा द्यावी लागते. सकाळी ९ ते ११.३० वाजताच्या दरम्यान शहरातील मुख्य मार्गावर व चौकात वाहतूक शाखेचे पोलीस गायब झालेले दिसतात. सकाळी ८ नंतर जड वाहने शहरात आणण्यास बंदी असतानादेखील वाहतूक पोलीस सर्रासपणे चिरीमिरी घेऊन त्यांना प्रवेश देतात. तसेच शहरात यंत्रमाग व्यवसाय असल्याने छोटी-मोठी वाहने बेशिस्तीने चालत असतात. यामुळे विद्यार्थी हितासाठी सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत महाविद्यालयीन मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.