बोईसर : जमिनीच्या वादातून नातेवाईकाची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका इसमाला रिव्हॉल्वर व चार जिवंत काडतुसांसह बोईसर पोलिसांनी काल शनिवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास मोठ्या शिताफीने पकडल्याने बोईसरमधील एक घटना टळली. उप विभागीय अधिकारी विजयकांत सागर आणि बोईसर पोलीस स्थानकाचे आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार तारापुर एमआयडीसीतील अस्ट्रा केम या कारखान्यात काम करणारा व बोईसर येथील हनुमान नगरच्या मोहम्मद सिकंदर अली यांच्या रुमवर मागील तीन वर्षापासून भाडोत्री म्हणून राहणारा व मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी अकसद अली गुलाम मोहम्मद शेख (३२) हा बोईसरमध्येच राहणार्या एका नातेवाईकाचा आज (रविवारी) दुपारी रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून खून करणार होता. याची खबर उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकांत सागर यांना मिळताच एपीआय आबासाहेब पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपनिरिक्षक एन. एस. कणसे, पोलीस नाईक सरदार व राऊत, नेमाडे, बडगुजर व तटकरे यांनी तात्काळ हनुमान नगर गाठून घर झडती घेतली असता जिवंत काडतुसासह चार काडतुसे मिळाली. या प्रकरणातील आरोपी अकसद शेख यास अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ जूनपर्यंत पी. सी. देण्यात आली आहे. मागील काही महिन्यापुर्वी बोईसरमध्ये एक खून झाल्यानंतर बोईसर सुमारे दोन महिने अशांत होते. (वार्ताहर)
रिव्हॉल्व्हरसह आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: June 2, 2014 04:08 IST