कल्याण : कल्याण-डोंबिवली परिवहनच्या ६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी २० फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढली असून आतापर्यंत यातील १६ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. शिवसेनेचे रवींद्र कपोते, मनसेचे राजेश कदम, इरफान शेख, काँग्रेसचे आरीफ पठाण ,राष्ट्रवादीचे साद खोत, भाजपाचे महेश जोशी हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. येत्या तीन महिन्यांत परिवहन समिती सदस्य निवडीबरोबरच स्थायी समिती, प्रभाग समित्यांची निवडणूक होणार आहे. परंतु, परिवहन समितीवर निवडून जाणाऱ्या सदस्यांना ४ वर्षांचा कालावधी मिळणार असल्याने येथे वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. समितीवर राष्ट्रवादीचा एकच सदस्य निवडून जाणार असला तरी या पक्षातील २१ कार्यकर्त्यांनी समितीवर संधी मिळावी, यासाठी विनंती अर्ज केल्याने यातून एकाला संधी देताना पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. इतर पक्षांमध्येही हिच परिस्थिती असून समितीवर कोणाची वर्णी लागते, याचे चित्र २० फेब्रुवारीला स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
परिवहन सदस्य निवडणूक : इच्छुकांची भाऊगर्दी
By admin | Updated: February 15, 2015 23:06 IST