महाड : मुंबई - गोवा महामार्गावर नियमितपणे होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे तसेच महामार्गाच्या दुरवस्थेमुळे धसका घेतलेल्या कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा प्रवास यंदा मात्र सुखरूप होत असल्याने चाकरमानी समाधान व्यक्त करीत आहेत. जिल्हाधिकारी सुमंत भांगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गाची नियोजनबध्द व्यवस्था उभारल्याने दरवर्षी होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यापासून चाकरमानी यंदा मात्र बचावले. रायगडचे पालकमंत्री सचिन अहिर यांनी देखील याबाबत सतत पाठपुरावा केल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, ठाणे आदी शहरातील मूळचे कोकणवासीय दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आपापल्या गावी जात असतात. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे गणेशोत्सवात यंदाही वाहतूक कोंडीमुळे आपल्या प्रवासात अडथळे येणार अशी भीती या चाकरमान्यांमध्ये होती. मात्र या मार्गाची युध्दपातळीवर दुरूस्ती केली गेल्याने वाहनधारकांचा त्रास कमी झाल्याचे दिसून आले. पेण ते वडखळ हा मार्ग तर वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र मानले जात असे. या मार्गाचे गेल्या आठ दिवसात नूतनीकरण करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा दूर झाला. या ठिकाणी अनेकवेळा दोन-तीन तास वाहतुकीची कोंडी होते. बुधवारी सायंकाळपासून तर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून शुक्रवारी सकाळपर्यंत ही वाहतूक कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (वार्ताहर)
महामार्गावर वाहतूक सुरळीत
By admin | Updated: August 29, 2014 00:13 IST