Join us  

२४ तासांमध्ये तब्बल १ हजार ३ विमानांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:48 AM

मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ तासांमध्ये तब्बल १ हजार ३ विमानांची वाहतूक झाली. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील २४ तासांत ही वाहतूक झाली आहे.

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ तासांमध्ये तब्बल १ हजार ३ विमानांची वाहतूक झाली. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील २४ तासांत ही वाहतूक झाली आहे़ देशातील विमानतळांमध्ये सर्वाधिक उत्तम कामगिरी म्हणून मुंबई विमानतळाकडे पाहिले जात आहे.मुंबई विमानतळ जगातील अत्यंत व्यस्त असलेले विमानतळ आहे. विशेष म्हणजे एका धावपट्टीवर उड्डाण व लँडिंग करून ही अभिमानास्पद कामगिरी करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वी ३ फेब्रुवारीला ९८० विमानांचे परिचालन करण्याची कामगिरी विमानतळाने केली होती. २००६मध्ये ५८४ विमानांचे २४ तासांमध्ये परिचालन केले जात होते. १२ वर्षांत त्या क्षमतेमध्ये दुपटीने वाढ करण्यात यश मिळाले आहे. २४ नोव्हेंबर २०१७ला ९६९ विमानांचे परिचालन करण्यात आले होते. विमानाचे लँडिंग करताना, आणीबाणीच्या प्रसंगीदेखील सुरळीतपणे विमान धावपट्टीवर उतरवण्यासाठी वैमानिकांना तांत्रिक साहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) प्रणालीमध्ये १७ मे ते २ जून या कालावधीत सुधारणा करण्यात आली. त्याचा लाभदेखील होऊ लागला आहे. विमानांचे उड्डाण व लँडिंग करण्यास विलंब टळण्यामध्ये या प्रणालीचा मोठा वाटा आहे.मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत मात्र त्या एकमेकांना छेदणाऱ्या असल्याने एका वेळी केवळ एकाच धावपट्टीचा वापर केला जाऊ शकतो. एकच धावपट्टी एसलेल्या लंडनमधील गेटविक विमानतळावर दररोज ८०० विमानांचे परिचालन केले जाते. मुंबई विमानतळ २४ तास कार्यरत असतो; मात्र गेटविक विमानतळ मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत बंद असतो. मुंबई विमानतळावरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मिळून वर्षभरात ४८.५० दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. सध्या विमानतळावरून दर तासाला सरासरी ४५ ते ५० विमानांचे परिचालन केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतची सर्वोत्तम कामगिरी तासाला ५२ ते ५५ आहे.

टॅग्स :विमान