Join us  

संक्रमण शिबिरातील रहिवाशांची माहिती होणार डिजिटल; म्हाडाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:36 AM

घुसखोरी, अनधिकृत व्यवहाराला बसणार चाप; भाडेवसुलीही होणार चोख

मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये किती रहिवासी राहतात, तसेच त्यांच्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी म्हाडामार्फतसर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही माहिती डिजीटल स्वरूपामध्ये जतन करण्यात येणार असल्याने ती कायमस्वरूपी जतन करता येणार आहे.

मुंबईमध्ये म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. या वसाहतींतील कोसळलेल्या अथवा धोकादायक झालेल्या इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरांतील गाळे उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु संक्रमण शिबिरामध्ये १५ ते २० वर्षांपेक्षा जास्त काळ रहावे लागत असल्याचे समोर आले आहे. तसेच काही भाडेकरूंनी संक्रमण शिबिरातील गाळ्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले असल्याचेही समोर आले आहे. तर संक्रमण शिबिरांमध्ये अनधिकृतरित्या अनेक घुसखोर शिबिरांमध्ये राहत असून कोट्यवधी रूपयांचे भाडे थकवले असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे हे भाडे वसुलीसाठी म्हाडाने संक्रमण शिबिरांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधारया सर्वेक्षणासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा आधारही घेण्यात येणार आहे. बायोमट्रीक्स सर्वेक्षणाच्या कामांसाठी झोपडपट्टी सुधार मंडळ, तसेच काही खाजगी संस्थांकडून सादरीकरणही झाले आहे. लवकरच संक्रमण शिबिरांच्या सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात येणार आहे. गाळ्यांमध्ये राहत असलेल्यांच्या भाडेकरूंना विविध कागदपत्रांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरची चाचपणी म्हाडा आयटीसेलकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :म्हाडा