पारोळ : ट्रान्सफॉर्मरकरिता वापरण्यात येणारे टीओबीएस हे लाखो रुपयांचे आॅईल परस्पर विकणाऱ्या ट्रकचालकाला व त्याच्या साथीदारांना आणि चोरीचा माल विकत घेणाऱ्यांनाही मांडवी पोलिसांनी गजाआड केले. शिवकांत तिवारी (२१) रा. बकिया, मध्य प्रदेश, धीरज गुप्ता (३५) रा. नालासोपारा आणि नीलम ठक्कर (३०) रा. भार्इंदर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी २६ डिसेंबरला ३ टन २४० किलो असे सुमारे ३ लाखांचे आॅइल वितरणासाठी नेत असताना ते नीलम ठक्कर यास परस्पर विकून रिकामा ट्रक खराडतारा, खानिवडे येथे टाकून तिवारी मध्य प्रदेश येथील आपल्या गावी फरार झाला.याप्रकरणी ट्रान्सपोर्टचे मालक दीपेश कामदार यांनी गुन्हा दाखल केला. विरार आणि मांडवी पोलिसांनी माहिती मिळवून शिवकांत तिवारी याला मध्य प्रदेशातून अटक केली. त्याला मांडवी येथे आणले असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितल्यावर गुप्ता व ठक्कर यांना अटक करण्यात आली. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून ७८ हजार रुपयांचे ६८६० किलो तेल जप्त केले. या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. (वार्ताहर)