Join us  

दोन हजारांच्या नोटेचे व्यवहार काळ्या पैशांसाठी; बँकिंग तज्ज्ञांचे मत; सामान्यांची फारशी गर्दी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन हजारांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी मुंबई ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन हजारांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरातील बँकामध्ये फार काही गर्दी झाली नव्हती. दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सरकारने पुरेसा वेळ दिल्याने बँकामध्येही फार काही गर्दी होणार नाही. मात्र, काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोठया बाजारात याचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतील, असे बँकिग तज्ज्ञ आणि बाजारपेठांतून सांगण्यात आले.

आता चिंता नाही मस्जिद बंदर येथील बाजारपेठांत दोन हजारांच्या रुपयांच्या नोटांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. आता येथील दुकानदार दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत असले तरीही व्यवहारात आलेल्या दोन हजारांच्या नोटांवरून दुकानदार चिंतेत आल्याचे चित्र होते.

त्रयस्थासाठी नोटा बदलीचा फॉर्मवांद्रे पूर्व येथील कार्डिनल हायस्कूलसमोरील जुन्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेत सकाळपासूनच नागरिकांनी २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रांग लावली होती. यामध्ये मोठ्या संख्येने महिला खातेदार होत्या. येथे स्वतः नोटा बदलण्यासाठी कोणतीही अट नव्हती. मात्र, आपले खाते सोडून दुसऱ्या कोणाच्या नोटा बदलायच्या असल्यास एक फॉर्म भरून घेतला जात होता. विशेष म्हणणे २० ते ३५ अशा २ हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दोन हजारांची नोट   नको रे बाबामुलुंडमधील एका खासगी रुग्णालयात बिलिंग काउंटरवर रुग्णाचे नातेवाइक रिफंड पैसे घेण्यासाठी थांबले असताना बिलिंग काउंटरवरील महिलेने पाचशेच्या नोटांपाठोपाठ दोन हजारांची नोट पुढे केली. मात्र, ती नोट बघूनच दोन हजार नको...हे नाही चालत म्हणत त्यांनी नोट हातातही घेतली नाही. महिलेने, अहो सगळे घेतात म्हणत नोट पुन्हा पुढे केली. मात्र, नातेवाइकाने नकोच म्हणत मला सुट्टे पैसे हवेत,  सांगून पाचशेच्या नोटा देण्यास तगादा लावला. अखेर, संबंधित महिलेने डोक्यावर आठ्या पाडत पाचशेच्या नोटा हाती देत काम सुरू केले. रांगेतील लोकांमध्ये मात्र हा चर्चेचा विषय बनलेला दिसून आला. 

नोटबंदीमुळे दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत लोकांना धास्ती होती. मात्र, बँकांत फार गर्दी नव्हती. चलनात तशाही नोटा कमी असल्याने फार काही गर्दी झाल्याचे चित्र नव्हते.-देवीदास तुळजापूरकर, बँकिंग तज्ज्ञ.

नोटा बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकेमध्ये फार काही गर्दी झाली नाही. नोटा बदलून देण्यासाठी आणि जमा करण्यासाठी  पुरेसा वेळ आहे. जो काही आहे तो केवळ काळा पैसा आहे.- विश्वास उटगी, बँकिंग तज्ज्ञ

रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट बदलण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. ५०० आणि १००० ची नोट बदलण्यासाठी बँकेत रांगा लावाव्या लागत होत्या. अशाच रांगा पुन्हा लावाव्या लागणार त्यात वेळही वाया जाणार.- नेहा साळकर

सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्यामुळे कॅश स्वतःकडे ठेवत नाही. ऑनलाइन कॅश ट्रान्स्फरमुळे सर्व सोपे झाले आहे. असे असले तरी रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.- साक्षी नाईक

टॅग्स :नोटाबंदीभारतीय रिझर्व्ह बँक