Join us  

राज्याचे कौशल्य अडगळीत बसून दाटीवाटीने घेतेय प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 8:24 AM

दीड महिना उलटूनही निवडणूक आयोगाचा आयटीआयच्या वर्गखोल्यांत ठिय्या; प्राध्यापकांना घ्यावे लागतात माळ्यावर शिकवणी वर्ग

सीमा महांगडे

मुंबई - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून महाराष्ट्राचे आणि देशाचे भावी कौशल्य विकसित होत असल्याच्या घोषणा सरकारकडून होत असताना मुंबईच्या आयटीआय इमारतीमध्ये मात्र शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर कुठे एकाच वर्गात माळ्यावर बसून तर अनेकदा खाली बसून प्रशिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देण्यात आलेल्या मुंबईतील आयटीआय इमारतीतील ६ वर्गखोल्या आणि सेंट्रल हॉल अद्यापही इलेक्शन कमिशनच्या ताब्यात असल्याने तेथे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी दाटीवाटीने बसून प्रशिक्षण घेत आहेत. मुंबईची शासकीय आयटीआय येथे राज्यातील पहिले आयटीआय वर्ग सुरू करण्यात आले. आज येथे एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई-१ आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (अल्पसंख्याक) - मांडवी यांचे प्रशिक्षण वर्ग कार्यरत आहेत. या तिन्ही आयटीआयमध्ये एकूण ६०० विद्यार्थी आयटीआयचे प्रशिक्षण घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने काही वर्गखोल्या, सेंट्रल हॉल ताब्यात घेतला. दीड महिना उलटूनही त्यांनी ताबा दिलेला नाही. या वर्गखोल्यांना अद्यापही टाळे लावून त्या बंद ठेवल्या आहेत; तर सेंट्रल हॉलमध्ये ईव्हीएमचे साहित्य नसूनही आयोगाचे कर्मचारी पंख्याची हवा खात बसल्याचे चित्र आहे. याउलट विद्यार्थ्यांना वर्ग नसल्याने एकाच वर्गात खाली आणि माळ्यावर बसवून शिकावे लागते. काही वेळेस तर विद्यार्थ्यांना केवळ प्रॅक्टिकलसाठी बोलावण्यात येते. यासंदर्भात आयटीआयचे संचालक अनिल जाधव यांना संपर्क केला असता आमच्याकडून या बाबीचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ठाकरे यांनी सांगितले की, वैयक्तिक कामासाठी नव्हे तर निवडणूक कामासाठी वर्गखोल्या ताब्यात घेतल्या होत्या. शिवाय ईव्हीएम मशीनचे साहित्य तेथे असल्याने अद्याप सेंट्रल हॉल रिकामा केला नव्हता; मात्र तो आम्ही लवकरच रिकामा करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

निवडणूक आयोगाचे काम संपले असले तरी आम्हाला अद्याप वर्गखोल्यांचा ताबा मिळाला नसल्याने तेथे वर्गखोल्या भरवता येत नाहीत. याविषयी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही उपयोग झाला नाही.  आम्ही लवकरच ताबा देऊ, अशी उत्तरे दिली जातात. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. - ए. जी. पवार, प्राचार्य, एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल

टॅग्स :राज्य सरकारनिवडणूक